वारसा
पप्पांना जाऊन आज एक महिना झाला. सुरुवातीला खूप आठवणी दाटून यायच्या, मन भरून यायचं, मोठ्या प्रयत्नाने डोळे कोरडे ठेवायला लागायचे.
काळ हाच सर्व दुःखावरचा उतारा असतो. हळूहळू सगळेच सावरलो. जीवनाच्या धकाधकीत दुःख बोथट व्हायला लागल.
आज सुट्टीचा दिवस. थोडा मोकळा वेळ होता. म्हटलं हिशोब मांडू. पप्पांनी आम्हा मुलांसाठी जहागीर ठेवलेय तिची यादी करू.
पप्पांनी मृत्युपत्र केलंय. त्यांच्या भौतिक संपत्तीच त्याच वाटप केलय. पण पप्पाच ते. जातीने बनिया असले तरी हिशोब त्यांना कधी नीट जमलाच नाही. साधी संपत्ती मृत्युपत्रात नीट मांडलीच नाही. आम्हा बहिण भावंडांसाठी काय काय ठेवून गेलेत म्हणून सांगू. त्याची किंमत कशी करायची. मोल कसे मांडायचे काहीच कळत नाही.
आम्ही दोन्ही बहिण भावंड अधाशासारखे वाचतो. पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र आताशा इंटरनेट काही काही आम्हाला वर्ज्य नाही. ललित असो की वैचारिक गद्य असो की पद्य कोणतेही लेखन आम्ही वाचून काढतो. लहानपणापासून लागलेल्या सवयीने आम्ही बहुश्रुत झालो. वाचल्यामुळेच आम्ही या जगात वाचलो.
लहानपणापासून आम्ही त्यांना वाचत असताना पाहत आलो आहोत. उत्तमोत्तम पुस्तक, मासिक त्यांनी लहानपणापासून आम्हाला उपलब्ध करून दिली. फारसे अवडंबर न माजवता त्यांनी हलकेच आम्हाला वाचनानंदाची गोडी लावली. ती शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल.
लहानपणी घरी तशी कडकीच असायची. पण तरी आनंदात कसे जगायचे याचे नियोजन पप्पा करायचे. बसने रेल्वेने त्यांनी आम्हाला सर्व मुंबई फिरवली. स्वस्त तिकीट काढून का होईना उत्तमोत्तम नाटक आणि सिनेमा दाखवले. दादर चौपाटीवर जाऊन कधी भेळ नाही खाल्ली पण मनमुराद किल्ले बांधले, कितीतरी सूर्यास्त पाहिले. मोजकेच पण छान पदार्थ घरी बनवायला आमच्या सुगरण आईला प्रोत्साहन दिले. परिस्थिती कशीही असो तब्येतीत जगता आले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबूनी घ्यावे ही कविता आम्ही अक्षरशः जगलो. आज आम्ही कितीतरी गोष्टींचा छान आस्वाद घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला सौंदर्य दिसते. ही सौंदर्यासक्ती पप्पांमुळेच मिळाली.
भरपूर शिकावे, नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात याकरता आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळाले. अभ्यासाव्यतिरिक्त भाषण, नाटक, गाणी अगदी एनसीसी कशातही भाग घ्यायला आम्हाला नेहमी प्रोत्साहन मिळायचे. ताईला शाळेने गाण्यासाठी निवडले. पप्पांना खरंच वाटेना. ते शिक्षिकेंना भेटायला गेले. तुम्हाला गाण्यातलं काय कळतंय आम्हाला नीट माहिती आहे तुमची मुलगी छान गाते, शिक्षिका म्हणाल्या. पप्पांनी आनंदाने होकार दिला. ताई क्रिकेट खेळायची. शाळेच्या क्रिकेट टीम मध्ये तिला घेतले. अगदी सीझनच्या चेंडूने क्रिकेट खेळायची. पप्पांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. पुढे ताईने क्रिकेट सोडून दिले. मी अंधेरीच्या शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लागलो. अगदी मॅरॅथॉन धावायचा प्रयत्न केला. एका क्रीडा दिनाला मला धावताना प्रोत्साहन द्यायला पप्पा आवर्जून आले. मी शर्यतीत चौथा आलो ही गोष्ट अलाहिदा.
नवनवीन गोष्टी शिकत राहायची, त्यांना भिडत राहायची आम्हाला सवय लागली. आजही ही शिकायची आस टिकून आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या व्यवसायात ठाम टिकून आहोत. ही आमच्या जीवनाची मोठी शिदोरी.
काही माणस आपल्या मुलांसाठी मोठमोठ्या हवेल्या, करोडोंची संपत्ती, दाग दागिने, जड जवाहर मागे ठेवून जातात. आमचे पप्पा तर त्यांच्याहीपेक्षा पुढे गेले. हे सगळं कमवायची क्षमता त्यांनी आम्हाला दिली. वर हे सगळं कमावलं तरी पाय ठामपणे जमिनीवरच राहतील असे संस्कार दिले.
पप्पा, यातल शतांशाने जरी आम्ही आमच्या मुलांना दिले तरी ती तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल.
सुयोग